मुखपृष्ठ Top News ईडीवरुन राष्ट्रवादीत संघर्ष; जयंत पाटलांच्या चौकशीवरून अजित पवारांनी सोडले मौन

ईडीवरुन राष्ट्रवादीत संघर्ष; जयंत पाटलांच्या चौकशीवरून अजित पवारांनी सोडले मौन

by PNI Digital

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले होते. या चौकशीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन करून त्यांची चौकशी केली. तसेच राज्यभरात ईडीच्या या कारवाईविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाच्या बड्या नेत्यांनी दांडी मारली. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन न केल्यानं राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा समोर आली आहे.

जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी फोन करुन विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आमचा जयंत पाटील यांना पाठिंबा असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांना फोन करून विचारपूस केली. केवळ अजित पवार यांनी फोन केला नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आंदोलनात वरीष्ठ नेत्यांची दांडी

जयंत पाटील यांची ईडीची चौकशी लागली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चा सांभाळला. दिवसभर ते त्याठिकाणी हजर होते. मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता. यामुळेच, ईडी चौकशीदरम्यान जयंत पाटील पक्षात एकाकी पडलेत का, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येत अंतर्गत संघर्ष सुरु आहे का? अजित पवार नाराज आहेत का, अशी चर्चा सुरु आहे.

अजित पवारांनी सोडलं मौन

या विषयावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही सातत्याने याबद्दल सांगितलं आहे की, वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या ज्या योजना असतात त्यांना वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो. त्यांना बोलवल्यानंतर ते पूर्णपणे सहकार्य करतात. अशाप्रकारे आपण पाहतो. जयंत पाटील यांना काही एकट्यानाच चौकशीसाठी बोलावलेलं नाही. याआधी छगन भुजबळ यांनाही बोलावलं आहे. त्यावेळी मी स्टेटमेंट दिलं? अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल यांना बोलावलं होतं. त्यावेळी मी काही स्टेटमेंट दिलं असेल तर दाखवा. तुम्ही जाणीवपूर्वक असा काहीतर अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मी कुणाबद्दल कुठलंही स्टेटमेंट करत नाही. माझ्याही घरामध्ये इनकम टॅक्सने धाडी टाकल्या होत्या. त्यावेळेस मी काय स्टेटमेंट करायचं ते केलं होतं”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या