मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने मुंबई उपनगरीय मार्गावर 238 वंदेभारत लोकल ट्रेनच्या खरेदीला मंजूरी दिली आहे. मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकल नेहमी बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे देखील नेहमीच बिघडत असतात, त्यामुळे या एसी लोकलची पुढील आवृत्ती म्हणून वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू करण्यात येणार आहे.
या वंदेभारत लोकलचे टेंडर निघाल्यानंतर टप्प्या टप्प्याने मुंबईत दाखल होणार आहे. मुंबई नागरी वाहतूक योजना ( एमयूटीपी ) – 3 आणि 3 ( अ ) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ यासंदर्भात टेंडर प्रक्रीया राबविणार आहे. मुंबई उपनगरी मार्गावर सध्या ‘भेल’ आणि ‘मेधा’ कंपनीच्या वातानुकूलित लोकल धावत असून त्यांची पुढील आवृत्ती म्हणून या आलिशान वंदेभारत मेट्रो धावणार असून मुंबईकरांचा प्रवासाचा अनुभव आमुलाग्र बदलणार आहे.
20 हजार कोटींचा खर्च येणार
मुंबईत लवकरच दाखल होत असलेल्या एसी लोकल या वंदे भारत एक्सप्रेसच्या श्रेणीतल्या असतील. या नवीन अपग्रेडेड लोकलसाठी रेल्वेला जवळपास 20 हजार कोटींचा खर्च येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. तर, कालांतराने मुंबईतील सर्वच लोकल वातानुकूलित करण्याचे रेल्वेचे टार्गेट आहे. ‘मेक इन इंडिया’ मार्गदर्शक तत्त्वांवर वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना अत्यंत आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल तसेच वाढत्या प्रवासी संख्येला या ट्रेन पुरक ठरतील असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी म्हटले आहे.