मुंबई: मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात नाले तुंबून रस्त्यांवर पाणी साचते. त्यामुळे मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांवरून सध्या राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाल्यांमध्ये उतरून नालेसफाईचा आढावा घेतला. तसेच महापालिका अधिकाऱ्यांना इशारा देखील दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओशिवरा येथे नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईचे काम पाहिले. यावेळी नाल्याच्या बाजूला गाळ काढून ठेवलेले त्याना दिसले त्यामुळे त्यांनी स्वतः नाल्यात उतरून नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. तसेच नालेसफाई करणाऱ्या कामगारासोबत संवाद साधून त्यांचे काम जाणून घेतले तसेच त्याला या कामाबद्दल शाबासकी दिली.
गाळ काढण्याची कामे काटेकोरपणे करा
रस्त्यांवरील कचऱ्याची तक्रार करता यावी, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत. जोरदार पावसात पाणी साचून मुंबईतील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नाल्यातून गाळ काढण्याची कामे काटेकोरपणे पूर्ण करावीत. आवश्यक ठिकाणी पाणी साठवण भूमिगत टाक्या, फ्लडगेट्सची यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना देखील त्यांनी दिली.
नदी नाल्यांमधील गाळ काढण्याचे आदेश
दहिसर येथील नद्यांच्या पात्रांना भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील एकनाथ शिंदेंनी केली. नदी-नाल्यांतून निघणारा गाळ तीन दिवसानंतर वाहून न्यायलाच हवा तो तिथेच ठेवल्यास पुन्हा नाल्यात जाऊ शकतो त्यामुळे त्यावर अधिक काटेकोरपणे काम करावे असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.