पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी) : किरकोळ वादातून पती पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीत उडी घेऊन एका दाम्पत्याने आपले जीवन संपविल्याची घटना जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे नवरा बायको हे मेंढपाळ आहेत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमनाथ संभाजी कुलाळ (वय 25) व मनीषा सोमनाथ कुलाळ (वय 20) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. लग्नानंतर गेल्या तीन महिन्यांपासून कुलाळ हे मेंढपाळ दांपत्य मेंढ्यांसह पिंपरी पेंढार गावाच्या नवलेवाडी परिसरात वास्तव्यास होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातूनच त्यांनी आपले जीवन संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
शवविच्छेदनासाठी पाठविला मृतदेह
सोमनाथ आणि मनिषा रहात असलेल्या काही अंतरावरच ती विहीर आहे. ही घटना घडल्यानंतर रहिवाशांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.