पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी) : पुण्यात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सायबर चोरट्यांनी आयटी इंजिनिअर असलेल्या तरुणास नोकरीच्या आमिषाने जाळ्यात ओढून, तब्बल 9 लाख 22 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या 28 वर्षीय तरुणाने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 3 एप्रिल ते 8 मे या कालावधीत घडली. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
टेलीग्रामचे टास्क देत पैसे उकळले
हा तरुण नोकरीच्या शोधात होता. त्याच संधीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी त्याला आपल्या जाळ्यात खेचले. त्याला नोकरी देण्याचे आमिष दाखवून टेलीग्रामचे टास्क पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला त्याला काही पैसेदेखील परत दिले. मात्र, पुढे पेड टास्क देत त्याच्याकडूनच वेळोवेळी तब्बल 9 लाख 75 हजार रुपये भरून घेतले. त्यानंतर त्याला न टास्कद्वारे काम केलेले पैसे दिले न त्याने गुंतवणूक केलेली रक्कम. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जानकर करीत आहेत.