मुंबई : एका कार्यक्रमादरम्यान एका महिलेनं मावस बहिणीच्या पर्समधून घराची आणि तिजोरीची चावी चोरली. त्या चावीच्या सहाय्याने घरात घुसून दोन तासात 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीची घटना डोंबिवलीतील मानपाडा येथे घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलेस तिच्या चप्पलच्या आधारे अटक करून 40 तोळे सोने हस्तगत केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारीला प्रिया सक्सेना नवी मुंबईतील नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. यावेळी प्रिया यांची मावस बहिण सिमरन पाटीलने पर्समधून चावी चोरली. त्यानंतर नवी मुंबई इथून ती खोनी पलावा इथे आली. चावीच्या साहाय्याने प्रिया सक्सेना यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून तिने दागिने चोरी केले. नंतर पर्समध्ये चावी ठेवायला ती पुन्हा कार्यक्रमस्थळी देखील पोहोचली, मात्र तिला चावी ठेवता आली नाही.
पर्समधून चावी चोरुन साधला डाव
प्रिया सक्सेना यांनी कार्यक्रमा दरम्यान त्यांनी आपली पर्स पाहिली असता पर्समधून घराची आणि लॉकरची चावी गायब होती. त्या घरी आल्या असता त्यांना घरातील दागिने देखील चोरीस गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसात अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरु केला.
चपलेमुळे पटली ओळख
या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. याच दरम्यान एक महिला संशयितरित्या आढळून आली. पोलिसांनी जेव्हा या महिलेची चप्पल पाहिली तेव्हा ती प्रिया सक्सेना यांची मावस बहीण सिमरन पाटील हिची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सिमरनला ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने केलेला गुन्ह्याची कबुली दिली. मानपाडा पोलिसांनी तिच्याकडून चोरी केलेले 40 तोळे सोने हप्तगत केले आहे. सिमरन काही दिवसांपूर्वी प्रिया हिच्या घरी राहण्यास आली होती, तेव्हाच तिने या घराची रेकी केली होती.