मुखपृष्ठ Top News बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी, जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी, जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

by PNI Digital

पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी): विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता बारावीचा निकाल लागला आहे. यंदा इयत्ता बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून, मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.

बारावीचा विभागवार निकाल

कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
कोल्हापूर 93.28 टक्के
औरंगाबाद 91.85 टक्के
नागपूर 90.35 टक्के
अमरावती 92.75 टक्के
नाशिक 91.66 टक्के
लातूर 90.37 टक्के
मुंबई 88.13 टक्के

बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण 14,28,194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,16,371 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकालाची टक्केवारी 91.25 आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या