पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी): भरधाव वेगाने येणारी कार आणि बस यांच्यात अपघात झाला. यानंतर ही कार थेट दोनशे फूट खोल कालव्यात कोसळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातुन जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मळद गावच्या हद्दीमध्ये पुण्याहून सोलापूरकडे जाताना हा अपघात झाला. पुण्याहून सोलापूरकडे जाताना खासगी बस (एनएल 01 बी 2004) आणि कार एमएच 14 डीटी 8363) यांच्यात अपघात झाला. अपघातात कार 200 फुट खोल कालव्यात पडली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. बलवंत विश्वनाथ तेलंगे आणि नामदेव जीवन वाघमारे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर
या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या सहाय्याने ही कार कालव्यातून बाहेर काढण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले होते. दोन्ही वाहने कुरकुंभ पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.